• बेळगाव माजी नगरसेवक संघटनेचे खासदार जगदीश शेट्टर यांना निवेदन

बेळगाव : शहरातील वारंवार उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्रातील तिलारी जलाशयातील अतिरिक्त पाणी राकसकोप जलाशयात वळविण्याच्या प्रस्तावाला नव्याने गती मिळाली आहे. या मागणीसंदर्भात बेळगावच्या माजी नगरसेवकांच्या संघटनेने खासदार जगदीश शेट्टर यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. या प्रस्तावाबाबत खासदार शेट्टर यांनी सकारात्मक भूमिका घेत पुढील पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

सर्किट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत शहरातील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती आणि भविष्यातील उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. दरवर्षी मे ते जुलै या कालावधीत राकसकोप आणि हिडकल जलाशयांतील पाणीसाठा कमी झाल्याने बेळगाव शहराला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यावर दीर्घकालीन उपाय म्हणून चंदगड तालुक्यातील तिलारी जलाशय आणि राकसकोप जलाशय यांची ‘राष्ट्रीय नदी जोड प्रकल्पा’अंतर्गत जोडणी करण्याची मागणी माजी नगरसेवकांनी केली.

माजी नगरसेवक संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव सुंठकर यांनी सांगितले की, तिलारी जलाशयात वीज निर्मितीनंतर मे ते जुलै या काळात मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त पाणी उपलब्ध असते. हे पाणी राकसकोप जलाशयात वळविल्यास बेळगाव शहरासह परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो. याशिवाय मार्कंडेय नदीच्या पात्रातून शेतीसाठीही या पाण्याचा लाभ होईल.

माजी नगरसेवक लतीफ खान पठाण यांनी सांगितले की, या योजनेसाठी यापूर्वीही विविध स्तरांवर प्रयत्न झाले आहेत. तिलारीचे पाणी बेळगावला उपलब्ध व्हावे यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांशी चर्चा करून हा विषय संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही उपस्थित केला जाणार आहे. हा प्रश्न भाषा किंवा सीमावादाशी न जोडता केवळ जनहिताच्या दृष्टीने मार्गी लावावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

खासदार जगदीश शेट्टर यांनी या प्रस्तावाचे स्वागत करत संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा करणार असल्याचे सांगितले. तसेच चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांच्यासमवेत तिलारी जलाशय परिसराची संयुक्त पाहणी करून प्रकल्प पुढे नेण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या बैठकीला नेताजी जाधव, दीपक वाघेला, वंदना बेळगुंदकर, रेणू किल्लेकर, सुधा भातकांडे, संजीव प्रभू, मोहम्मद पिरजादे यांच्यासह माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.