- प्रेम सुतार, पृथ्वी सुतार, प्रथमेश पाटील आणि अपेक्षा पुजारी यांचा गौरव
- १४५ कराटेपटूंचा बेल्ट परीक्षेत सहभाग
बेळगाव : इंडियन कराटे क्लब आणि बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेच्या वतीने मच्छे येथील सप्तपदी मंगल कार्यालयात आयोजित कराटे कलर बेल्ट परीक्षा आणि ब्लॅक बेल्ट प्रदान समारंभ उत्साहात पार पडला. या परीक्षेत १४५ कराटेपटूंनी सहभाग नोंदविला.
यावेळी प्रेम सुतार, पृथ्वी सुतार, प्रथमेश पाटील आणि अपेक्षा पुजारी या चार विद्यार्थ्यांना त्यांच्या सातत्यपूर्ण सराव, कठोर मेहनत आणि उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर ब्लॅक बेल्ट प्रदान करून गौरविण्यात आले.
हे चारही विद्यार्थी गेल्या नऊ वर्षांपासून इंडियन कराटे क्लबच्या मच्छे शाखेत नियमित प्रशिक्षण घेत असून राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये पदके पटकावत त्यांनी संस्थेसह बेळगावचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या यशामागे कराटे प्रशिक्षक निलेश गुरखा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
समारंभाला आदिवीर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पद्मराज पाटील, काँग्रेस साऊथच्या नेत्या माधुरी जाधव तसेच इंडियन कराटे क्लब आणि बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेचे अध्यक्ष कराटे मास्टर गजेंद्र काकतीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांचाही शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत कराटेमुळे शिस्त, आत्मविश्वास, स्वसंरक्षणाची क्षमता आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इंडियन कराटे क्लबच्या लेडी चीफ इन्स्ट्रक्टर हेमलता ग. काकतीकर तसेच प्रशिक्षक प्रभाकर किल्लेकर, परशुराम काकती, विजय सुतार, हरीष सोनार, रतिक लाड आणि किरण गडकर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्षिता जांगिड यांनी केले.








