- बीएलओ आणि बीएलए कर्मचाऱ्यांच्या अडचणींबाबत निवेदन
- तातडीने उपाययोजनांची मागणी
बेळगाव : मतदार यादी पुनरिक्षण मोहिमेदरम्यान बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) आणि बूथ लेव्हल एजंट (बीएलए) यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींबाबत भारतीय जनता पक्षाचे नेते किरण जाधव यांनी खासदार जगदीश शेट्टर यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
या भेटीत बीएलओ आणि बीएलए कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष सर्वेक्षणादरम्यान येणाऱ्या प्रशासकीय अडचणी, नागरिकांशी समन्वय साधताना निर्माण होणाऱ्या समस्या तसेच मतदार यादी पुनरिक्षण मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
किरण जाधव यांनी या सर्व समस्या संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून त्यावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली. निवेदन स्वीकारल्यानंतर खासदार जगदीश शेट्टर यांनी बीएलओ आणि बीएलए कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्या गांभीर्याने विचारात घेतल्या जातील, अशी ग्वाही दिली.
संबंधित विभाग आणि शासनाकडे या विषयाचा पाठपुरावा करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन देतानाच मतदार यादी पुनरिक्षणाचे महत्त्वाचे काम प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. यावेळी हनुमंत कागलेकर, राजन जाधव, गणेश देधे, पार्थ भोसले आणि विनायक शिंगावकर उपस्थित होते.








