- दोन रौप्य, एक कांस्य पदकाची कमाई
- राष्ट्रीय कनिष्ठ जलतरण स्पर्धेसाठी कर्नाटक संघात निवड
बेळगाव : कर्नाटक राज्य जलतरण संघटनेच्या वतीने बेंगळुरू येथील बसवनगुडी जलतरण तलावात आयोजित कनिष्ठ गटाच्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या आबा अँड हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटू तनुज सिंग याने उल्लेखनीय कामगिरी करत दोन रौप्य आणि एक कांस्य पदकाची कमाई केली आहे. या उत्कृष्ट यशाच्या बळावर त्याची पुढील महिन्यात ओडिशामध्ये होणाऱ्या राष्ट्रीय कनिष्ठ जलतरण स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य संघात निवड झाली आहे.
स्पर्धेतील ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात तनुजने ३०.६४ सेकंदांची वेळ नोंदवत रौप्य पदक पटकावले. त्यानंतर २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक शर्यत २ मिनिटे ३२.०९ सेकंदांत पूर्ण करून आणखी एक रौप्य पदक आपल्या नावावर केले.
याशिवाय १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक स्पर्धेत १ मिनिट ०९.४८ सेकंदांची वेळ नोंदवत त्याने कांस्य पदकही जिंकले. सलग तीन प्रकारांमध्ये पदकांची कमाई करत तनुजने राज्यस्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली.
या यशामुळे पुढील महिन्यात ओडिशा येथे होणाऱ्या राष्ट्रीय कनिष्ठ गट जलतरण स्पर्धेत कर्नाटकचे प्रतिनिधित्व करण्याची संधी तनुजला मिळाली आहे.
तनुजच्या यशामागे एनआयएस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार यांचे मार्गदर्शन लाभले असून, आबा अँड हिंद स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष शीतल हुळभत्ते, अरविंद संगोळी, शुभांगी मंगळूरकर तसेच नगरसेवक नितीन जाधव यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.








