• खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले
  • जखमींना भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले

खानापूर : खानापूर-जांबोटी मार्गावरील शनया गार्डनजवळ रस्त्यातील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात ऑटो रिक्षावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा रस्त्याच्या कडेला उलटून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सहा महिलांसह सात जण जखमी झाले असून, तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बेळगावला हलवण्यात आले आहे.

खानापूर शहरातील नाईक गल्ली परिसरातील रहिवासी एका नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी आंबोळी गावाकडे ऑटो रिक्षाने जात होते. शनया गार्डनजवळ पोहोचताच रस्त्यातील मोठे खड्डे आणि पसरलेल्या खडीमुळे चालकाने रिक्षा वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रिक्षा रस्त्याच्या कडेला उलटली.

या अपघातात यल्लव्वा नाईक, केंशव्वा नाईक, बसव्वा नाईक, महादेवी देसूरकर, दुर्गव्वा देसूरकर, शांता देसूरकर आणि रुद्रप्पा नाईक हे जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच त्याच मार्गावरून जांबोटीकडे जात असलेले भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष पंडित ओगले, अनंत सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी आपल्या बोलेरो आणि वॅगनआर वाहनांतून सर्व जखमींना तत्काळ खानापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

जखमींपैकी बसव्वा नाईक, केंशव्वा नाईक आणि दुर्गव्वा देसूरकर यांना गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी बेळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

या बचावकार्यामध्ये सनी मायेकर, बंटी बुवाजी, ज्योतिबा चौगुले आणि निलेश कुंभार यांनीही सक्रिय सहकार्य केले.

दरम्यान, खानापूर-जांबोटी रस्त्यावरील मोठ्या प्रमाणातील खड्डे आणि निकृष्ट रस्त्याच्या अवस्थेमुळेच हा अपघात घडल्याचा आरोप नागरिकांनी करत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच या मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणीही स्थानिकांकडून करण्यात आली आहे.