- जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचे निर्देश
- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पूर्वतयारी बैठक
बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून जबाबदारीने काम करावे. अधिवेशनाची संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा आणि व्यवस्था वेळेत पूर्ण कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी (२२ ऑक्टोबर) हिवाळी अधिवेशन २०२६ च्या पूर्वतयारीसाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. अधिवेशनाच्या आयोजनासाठी पुरेसा वेळ उपलब्ध असल्याने प्रत्येक विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने काम पूर्ण करावे आणि सोपविलेली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
- विविध उपसमित्यांची स्थापना :
अधिवेशनाच्या व्यवस्थापनासाठी विविध उपसमित्या स्थापन करण्यात येणार आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या निश्चित करून त्यानुसार कार्यवाही करावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. अधिवेशनासाठी येणारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि इतर मान्यवरांच्या स्वागतासह त्यांच्या निवास, भोजन आणि वाहतुकीची योग्य व्यवस्था करण्यावर त्यांनी भर दिला.
मान्यवरांच्या निवासाची व्यवस्था करताना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या हॉटेल व्यवस्थापनाशी संपर्क साधून खोल्यांचे आरक्षण करावे, असेही त्यांनी सांगितले.

- इंटरनेट आणि वैद्यकीय सुविधांवर विशेष लक्ष :
सुवर्णसौध येथे अधिवेशनाचे कामकाज सुरू असताना इंटरनेट सेवेत कोणताही व्यत्यय येणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच अधिवेशनासाठी उपस्थित राहणारे मान्यवर, अधिकारी आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी वास्तव्यास असलेल्या ठिकाणी आपत्कालीन वैद्यकीय पथके सज्ज ठेवण्याची सूचना करण्यात आली.
अधिवेशनाच्या कालावधीत सर्व व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. कोणत्याही स्तरावर निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे सांगत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दक्षतेने काम करण्याचे निर्देश दिले.
या बैठकीला पोलीस आयुक्त प्रकाश निकम, जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन, प्रशिक्षणार्थी ए.ए.एस. अधिकारी रोहित सिंग, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.








