- सीमाभागातील विद्यार्थ्यांना रोख पारितोषिकांची संधी
- सर्व सहभागींचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव
बेळगाव : सीमाभागातील विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वकौशल्याला वाव देण्यासाठी राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आणि विश्व भारत सेवा समिती, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता शहापूर येथील पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयात ही स्पर्धा होणार आहे.
स्पर्धेत प्राथमिक आणि माध्यमिक असे दोन गट असतील. विद्यार्थ्यांना विविध सामाजिक, शैक्षणिक आणि समकालीन विषयांवर आपले विचार मांडण्याची संधी मिळणार आहे.
- दोन्ही गटांसाठी विविध विषय :
- प्राथमिक गट (इयत्ता पाचवी ते सातवी)
- मातृभाषेतील शिक्षण : काळाची गरज
- माझे बालपण, माझे कुटुंब
- माझा भारत आणि माझी जबाबदारी
- प्रदूषणमुक्त भारत
- माध्यमिक गट (इयत्ता आठवी ते दहावी)
- माझी मातृभाषा : २१ व्या शतकातील वाटचाल
- आजचा तरुण आणि सोशल मीडियाचा विळखा
- बदलाचे वारे आणि जेन झी (Gen Z)
- लोकशाही आहे कुठे? एक विचारमंथन
विजेत्यांना रोख पारितोषिके : स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे.
प्राथमिक गट : प्रथम क्रमांक ₹१,५००, द्वितीय क्रमांक ₹१,०००, तृतीय क्रमांक ₹७५० आणि उत्तेजनार्थ स्मृतिचिन्ह.
माध्यमिक गट : प्रथम क्रमांक ₹२,०००, द्वितीय क्रमांक ₹१,५००, तृतीय क्रमांक ₹१,००० आणि उत्तेजनार्थ स्मृतिचिन्ह.
प्रशस्तीपत्र : सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र दिले जाईल.
याशिवाय उत्तेजनार्थ स्मृतिचिन्ह दिले जाणार असून, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येईल. स्पर्धा संपल्यानंतर त्याच दिवशी पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.
- स्पर्धकांसाठी नियम व अटी :
स्पर्धकांना दिलेल्या विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर वक्तृत्व सादर करावे लागेल. भाषणादरम्यान राजकीय, धार्मिक किंवा जातीय भावना दुखावणारी विधाने अथवा घोषणाबाजी करण्यास मनाई आहे. सहभागी विद्यार्थ्यांनी शाळेचे ओळखपत्र किंवा आधारकार्डची छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार आहे.
- सहभागासाठी आयोजकांचे आवाहन :
सीमाभागातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपल्या वक्तृत्वकौशल्याचे प्रदर्शन करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्पर्धेसंदर्भातील अधिक माहितीसाठी प्रकाश नंदिहळी (९८८०५५२२७९) किंवा मयूर नागेनहट्टी (९६६३६५४५७७) यांच्याशी संपर्क साधता येईल.








