बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने ‘आठवांच्या तळाशी’ हा कवयित्री सीमा कणबरकर यांच्या कवितांचा विशेष कार्यक्रम तसेच उपस्थितांचे खुल्या काव्यसंमेलनाचे आयोजन शनिवार, दि. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता शहीद भगतसिंग सभागृह, गिरीश कॉम्प्लेक्स, रामदेव गल्ली सभागृहात करण्यात आले आहे.

कवयित्री सीमा कणबरकर या होनगा (ता. बेळगाव) येथील असून त्या प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. अलीकडच्या काळातील एक प्रभावी कवयित्री म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. कडोली, कुद्रेमानी, येळूर आदी ठिकाणी झालेल्या मराठी साहित्य संमेलनातून निमंत्रित कवयित्री म्हणून त्यांनी आपली छाप पाडली आहे. उत्तमोत्तम कविता आणि प्रभावी सादरीकरणाने त्यांनी रसिकांची मने जिंकली आहेत. ग्रामीण जीवनाचे प्रभावी चित्रण त्यांच्या कवितांमधून आढळते. आपल्या अवती भवतीचे जग, शेती-माती, स्त्रित्वाचे विविध पदर त्या अलगदपणे आपल्या कवितांमधून मांडतात.

या कार्यक्रमात सीमा कणबरकर आपल्या आगळ्या वेगळ्या शब्द सामर्थ्याची अनुभूती त्यांच्या काव्यातून देणार आहेत. त्यांच्या प्रभावी आणि रसिकांना भावणाऱ्या सादरीकरणाचा आस्वाद घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. यावेळी प्रारंभी स्थानिक कवींसाठी खुले काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.

या साहित्यिक कार्यक्रमास सर्व साहित्यप्रेमी, कवी, रसिक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगावचे सचिव श्री. सुधाकर गावडे यांनी केले आहे.