खानापूर : कक्केरी येथील यात्रेसाठी नातेवाइकांकडे आलेल्या १८ वर्षीय युवकाचा हुलिकेरी येथील इंदिरम्मा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (२१ ऑक्टोबर) घडली. गणेश केदार्जी पुजारी (वय १८, रा. तडकोड, ता. धारवाड) असे मृत युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कक्केरी येथील श्री बिष्टादेवी यात्रेनिमित्त गणेश आपल्या नातेवाइकांच्या घरी हुलिकेरी येथे आला होता. सणाच्या निमित्ताने तो कुटुंबीयांसोबत तलाव परिसरात गेला होता. यावेळी पोहण्यासाठी तो तलावातील पाण्यात उतरला.
मात्र, तलावाच्या पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने घाबरलेल्या गणेशचा बुडून मृत्यू झाला.
या घटनेमुळे हुलिकेरी परिसरात शोककळा पसरली असून, गणेशच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी अळणावर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.







