बेळगाव : कडोली येथील मराठी साहित्य संघाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ४२ व्या मराठी साहित्य संमेलनाची तारीख निश्चित झाली आहे. हे संमेलन रविवार, १० जानेवारी २०२७ रोजी होणार आहे. साहित्य संघाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत संमेलनाच्या तारखेवर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले.
मराठी साहित्य संघाच्या कार्यालयात मंगळवारी (२० ऑक्टोबर) संघाचे अध्यक्ष मोहन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी आगामी साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
कडोली परिसरातील मराठी साहित्यप्रेमींसाठी हे संमेलन महत्त्वाचा सांस्कृतिक सोहळा मानले जाते. या माध्यमातून साहित्यिक, कवी, कथाकार आणि वाचकांना एकत्र येण्याची संधी मिळते. मराठी भाषा आणि साहित्याच्या संवर्धनाबरोबरच नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यातही या संमेलनाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
बैठकीत संमेलनातील विविध कार्यक्रमांचे स्वरूप, संमेलनाध्यक्षांची निवड तसेच व्याख्याते, कवी, कथाकार आणि अन्य निमंत्रित मान्यवरांच्या सहभागाबाबत चर्चा करण्यात आली. संमेलनातील साहित्यिक सत्रे दर्जेदार व्हावीत आणि अधिकाधिक साहित्यप्रेमींना सहभागी होता यावे, यासाठी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विविध सूचना मांडल्या.
या बैठकीला संघाचे उपाध्यक्ष शिवराज कालकुंद्रीकर, माजी अध्यक्ष अरुण पाटील, बसवंत शाहपूरकर, भरमाणी डोंगरे, शिवाजी कुट्रे, विलास बामणे, सुधीर कुट्रे, दीपक होनगेकर, तानाजी कुट्रे, सुनील पाटील आणि संभाजी पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








