• जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांच्याकडून रुग्णांची विचारपूस

बेळगाव : चिक्कोडी तालुक्यातील जोडट्टी गावात शेल्लव्वा देवीच्या जत्रेतील प्रसादाचे सेवन केल्यानंतर अनेक भाविकांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी गुरुवारी कब्बूर येथील शासकीय आरोग्य केंद्राला भेट देऊन उपचार घेत असलेल्या रुग्णांची विचारपूस केली.

रुग्णांची भेट घेतल्यानंतर राहुल शिंदे यांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. तसेच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले. सर्वांना आवश्यक वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रकृती गंभीर झाल्यास पुढील उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था ठेवावी, अशा सूचना त्यांनी डॉक्टरांना दिल्या. यावेळी रुग्णांना दिल्या जाणाऱ्या औषधोपचारांचाही त्यांनी आढावा घेतला.

घटनेचे कारण शोधण्यासाठी प्रसादाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवून त्यांची तपासणी करावी, तसेच संबंधित प्रकरणाची सविस्तर चौकशी करावी, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले. याशिवाय गावात आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करून नागरिकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले.

या वेळी सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. एम. पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. एस. कानडाळे, तालुका पंचायत सहायक संचालक शिवानंद शिरगवी, डॉ. अनिल परिट, डॉ. जयलक्ष्मी मुसाळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.