- सीमाप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे आवाहन
चंदगड : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाकडे लक्ष वेधून हा प्रश्न तातडीने सोडविण्याच्या मागणीसाठी बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे दरवर्षी १ नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळण्यात येतो. यंदाच्या काळ्या दिनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने ‘चलो बेळगाव’चा नारा देत शिनोळी फाटा, चंदगड येथे निदर्शने करण्यात येणार आहेत.
कर्नाटक राज्याच्या स्थापना दिनी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे काळा दिन पाळला जातो. यानिमित्त मिरवणूक, निदर्शने आणि सभा असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाशी शिवसेना सुरुवातीपासूनच जोडलेली असून, या प्रश्नावर सातत्याने आंदोलन करीत आली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा दर्शविण्यासाठी कोल्हापूर जिल्हा शिवसेनेतर्फे १ नोव्हेंबर रोजी ‘चलो बेळगाव’चा नारा देण्यात आला आहे. याच दिवशी शिनोळी फाटा, चंदगड येथे निदर्शने करून सीमाप्रश्नाकडे आणि सीमाभागातील बांधवांवर होणाऱ्या अन्यायाकडे लक्ष वेधण्यात येणार आहे.
या आंदोलनात सीमाभागातील बांधव आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.








