- महाराष्ट्र एकीकरण समितीचे सीमाभागातील मराठी जनतेला आवाहन
बेळगाव : १ नोव्हेंबर १९५६ रोजी भाषावार प्रांतरचनेनुसार विविध भाषिक राज्यांची निर्मिती करण्यात आली. यावेळी कर्नाटक राज्याची निर्मिती करताना बेळगाव, कारवार आणि बिदर येथील मराठी भाषिक प्रदेश अन्यायाने कर्नाटकात (तत्कालीन म्हैसूर राज्यात) समाविष्ट करण्यात आला. या अन्यायाचा निषेध करण्यासाठी आणि सीमाभागातील मराठी जनतेची महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी दरवर्षी १ नोव्हेंबर रोजी काळादिन पाळण्यात येतो. यानिमित्ताने १ नोव्हेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित सायकल फेरीत सीमाभागातील मराठी जनतेने प्रचंड संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीने केले आहे.
भाषावार प्रांतरचना करताना मराठी भाषिक प्रदेशावर झालेल्या अन्यायाविरोधात १ नोव्हेंबर १९५६ पासून सीमाभागातील मराठी जनता केंद्र सरकारविरोधात आपला असंतोष व्यक्त करीत आहे. गेल्या ७० वर्षांपासून मराठी भाषिक एकत्र येऊन महाराष्ट्रात सामील होण्याची आपली मागणी सातत्याने मांडत आहेत. सत्याग्रह, साराबंदी, हरताळ, बंद, मेळावे, निदर्शने आणि मोर्चे अशा विविध माध्यमांतून मराठी जनतेने आपला विरोध नोंदविला आहे. अनेकदा आश्वासने देऊनही केंद्र सरकारने सीमाप्रश्न प्रलंबित ठेवल्याची भूमिका समितीने मांडली आहे.
सीमाप्रश्नाबाबत महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल करून कायदेशीर लढा सुरू केला आहे. सर्वोच्च न्यायालयातील या लढ्याबरोबरच रस्त्यावरील आंदोलनही महत्त्वाचे असल्याचे समितीने म्हटले आहे. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून १ नोव्हेंबर रोजी सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी, १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता बेळगाव येथील छत्रपती श्री संभाजी उद्यानातून सायकल फेरीला प्रारंभ होणार आहे. या फेरीत सीमाभागातील मराठी जनता, कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपली भूमिका पुन्हा एकदा केंद्र सरकारपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.








