- उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता
- पाणीपुरवठ्याच्या नियोजनाची गरज
बेळगाव : बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयातील पाणीसाठ्यात यंदा लक्षणीय घट झाली आहे. सप्टेंबर महिन्यातच पावसाने दडी मारल्याने जलाशयातील पाण्याची आवक लवकर थांबली आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात, विशेषतः एप्रिल आणि मे महिन्यांत शहरात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या राकसकोप जलाशयातील पाण्याची पातळी २४७२.६० फूट इतकी आहे. गतवर्षी याच दिवशी ही पातळी २४७५.८० फूट होती. म्हणजेच यंदा पाण्याची पातळी ३.२० फूटने कमी आहे. राकसकोप जलाशयाची क्षमता अर्धा टीएमसी असून, दरवर्षी ऑक्टोबरपर्यंत विविध नद्यांमधून जलाशयात पाण्याची आवक सुरू असते. मात्र, यंदा सप्टेंबरमध्येच पाऊस थांबल्याने आवक बंद झाली आहे. परिणामी, उपलब्ध पाणीसाठ्यात घट होऊ लागली आहे.
बेळगाव शहराला राकसकोप आणि हिडकल या दोन जलाशयांतून पाणीपुरवठा केला जातो. राकसकोपमधील पाणीसाठा कमी होत असला तरी हिडकल जलाशयाची स्थिती तुलनेने समाधानकारक आहे. या जलाशयाची क्षमता ५१ टीएमसी असून, सध्या ५०.६०५ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, या जलाशयातील पाण्याची आवकही बंद झाली आहे.
गतवर्षी याच दिवशी हिडकल जलाशयात ५०.८७० टीएमसी पाणीसाठा होता. त्या तुलनेत यंदा ०.२६५ टीएमसीने घट झाली आहे. सध्या उपलब्ध असलेला साठा समाधानकारक असला तरी पुढील काळातील पाण्याची मागणी लक्षात घेऊन नियोजन करणे आवश्यक आहे.
उन्हाळ्यात शहरातील पाण्याची मागणी वाढत असल्याने दोन्ही जलाशयांतील उपलब्ध साठ्याचा नियमित आढावा घेणे गरजेचे आहे. पाण्याचे योग्य वितरण, वापरावर नियंत्रण आणि उपलब्ध साठ्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन केल्यास संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करता येऊ शकते. त्यामुळे संबंधित प्रशासनाने आतापासूनच आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे.








