• पोलीस विभागाशी संबंधित तक्रारींचे तातडीने निवारण करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

बेळगाव : बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील अनुसूचित जाती-जमातींच्या नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी गुरुवार, २९ ऑक्टोबर २०२६ रोजी मासिक बैठक आयोजित करण्यात आली. पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीला अनुसूचित जाती-जमातींचे सुमारे १०० ते १२० नेते आणि सदस्य उपस्थित होते.

बैठकीत उपस्थितांनी आपल्या विविध समस्या आणि तक्रारी मांडल्या. संबंधित अधिकाऱ्यांनी या सर्व तक्रारी सविस्तरपणे ऐकून घेतल्या. पोलीस विभागाशी संबंधित तक्रारींचे प्राधान्याने आणि तातडीने निवारण करण्याच्या सूचना उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

इतर शासकीय विभागांशी संबंधित समस्यांच्या निवारणासाठी संबंधित विभागांना पत्र पाठविण्याची कार्यवाहीही करण्यात आली. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन त्यांचे योग्य प्रकारे निराकरण करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

या बैठकीला शहरातील कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी, गुन्हे व वाहतूक विभागाचे डीसीपी, सर्व उपविभागांचे एसीपी, विविध पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक, डीसीआरई पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच महसूल विभाग, महानगरपालिका आणि समाजकल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.