• विजय देवणे यांच्यासह २५ महाराष्ट्र एकीकरण समिती व शिवसेना कार्यकर्त्यांवर जिल्हाधिकाऱ्यांचा प्रतिबंधात्मक आदेश

बेळगाव : कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय शामराव देवणे यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेच्या सुमारे २५ कार्यकर्त्यांना १ नोव्हेंबर २०२६ रोजी बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या अहवालानुसार, १ नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्योत्सवाच्या दिवशी विजय देवणे यांच्यासह सुमारे २५ महाराष्ट्र एकीकरण समिती व शिवसेना कार्यकर्ते निपाणी मार्गे बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करून प्रस्तावित काळा दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे.

निपाणी-कोगनोळी हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर असून, कर्नाटक आणि महाराष्ट्राला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. संबंधित नेत्यांचा प्रस्तावित दौरा आणि काळा दिनाच्या कार्यक्रमातील सहभागामुळे कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वादाच्या संदर्भात चिथावणीखोर भाषणे किंवा वक्तव्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कन्नड आणि मराठी भाषिक समुदायांमध्ये भाषिक तणाव निर्माण होण्याबरोबरच सार्वजनिक शांतता भंग होण्याची आणि सार्वजनिक तसेच खासगी मालमत्तेचे नुकसान होण्याची भीती पोलीस अधीक्षकांनी अहवालात व्यक्त केली आहे.

प्रवेशबंदी घालण्यात आलेल्यांमध्ये शिवसेना (उद्धव गट) कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय शामराव देवणे, शिवसेना उपाध्यक्ष संजय पवार, कोल्हापूर शहरप्रमुख सुनील मोडी, शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, कोल्हापूर शहरप्रमुख विशाल देवकुळे आणि कोल्हापूर जिल्हा शहरप्रमुख मंजीत माने यांच्यासह त्यांच्यासोबत येणाऱ्या अन्य महाराष्ट्र एकीकरण समिती व शिवसेना कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

पोलीस अधीक्षकांच्या अहवालाचा विचार करून तसेच कर्नाटक राज्योत्सवाच्या दिवशी कोणतीही अनुचित घटना घडू नये, सार्वजनिक शांतता आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने हा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून बेळगावचे उपआयुक्त तथा जिल्हादंडाधिकारी मोहम्मद रोशन यांनी १ नोव्हेंबर २०२६ रोजी संबंधित व्यक्तींना बेळगाव जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करण्यास मनाई केली आहे. हा आदेश अंमलात आणण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहेत.