• यल्लम्मा डोंगराच्या विकासासाठी २१५ कोटींच्या कामांना लवकरच प्रारंभ

बेळगाव :  जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी गुरुवारी आपल्या कुटुंबासह सौंदत्ती येथील पवित्र श्री यल्लम्मा देवी मंदिराला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले.

यल्लम्मा डोंगरावर दर्शन घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यल्लम्मा डोंगराच्या सर्वांगीण विकासासाठी सुमारे २१५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून निविदा प्रक्रियेलाही मान्यता प्राप्त झाली आहे. लवकरच विकासकामांना सुरुवात करण्यात येणार असून ती ११ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले.

यल्लम्मा गडाच्या विकासासाठी सर्वंकष आराखडा तयार करण्यात आला असून तो निश्चित कालमर्यादेत राबवून भाविकांना आवश्यक त्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, कन्या रूहीच्या जन्मानिमित्त कुटुंबासह यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी आलो आहे. श्रीक्षेत्र यल्लम्मा हे जागृत आणि पवित्र तीर्थक्षेत्र असून येथे येणाऱ्या भाविकांनी श्रद्धा, भक्ती आणि विश्वासाने देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी त्यांच्या पत्नी अंकिता, यल्लम्मा मंदिर विकास प्राधिकरणाच्या कार्यकारी सचिव प्रभावती फकीरपूर, अयान, रूही, मडू, सवदत्ती नगरपालिकेचे आयुक्त संगनबसय्या, मल्लू जकाती, अल्लमप्रभू प्रभुनवर, मंजुनाथ अंगडी, अमीन गोरिनाई, प्रभू हंजगी, सदानंद इटी, जगदनगौडा पोलेशी, मंजुनाथगौडा संधिमनी, पंडित यडूरय्या तसेच मंदिराचे कर्मचारी उपस्थित होते.