- सोशल मीडियावर काहीही पोस्ट करण्यापूर्वी सतर्क राहा
- पोस्ट करणाऱ्यांसह फॉरवर्ड करणाऱ्यांवरही होणार कारवाई
- बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांचा इशारा
बेळगाव : सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट, व्हिडिओ किंवा संदेश शेअर करण्यापूर्वी नागरिकांनी अधिक सतर्क राहावे, असा इशारा बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिला आहे. सोशल मीडियावरील गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पोलिसांनी विशेष सायबर सेल सुरू केला असून, तो २४ तास कार्यरत राहणार आहे.
पोलीस अधीक्षक रामराजन यांनी सांगितले की, प्रक्षोभक पोस्ट, अफवा पसरवणारा मजकूर, द्वेषपूर्ण संदेश तसेच ऑनलाइन माध्यमांतून धमकावणारे व्हिडिओ आणि संवाद प्रसारित करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर सायबर सेलची विशेष नजर राहणार आहे. सोशल मीडियाचा गैरवापर करून कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर तातडीने आणि कठोर कारवाई केली जाईल.
आधुनिक तांत्रिक साधनसामग्रीच्या मदतीने संशयास्पद स्टेटस, व्हायरल व्हिडिओ आणि आक्षेपार्ह पोस्ट्सचा मागोवा घेणे आता पोलिसांना सहज शक्य झाले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर बेजबाबदारपणे वावरणाऱ्यांना पोलिसांकडून थेट कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
केवळ आक्षेपार्ह पोस्ट तयार करणाऱ्यांवरच नव्हे, तर फेक न्यूज किंवा हेट स्पीच असलेला मजकूर पुढे पाठवणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करताना रामराजन यांनी नागरिकांना जबाबदारीने सोशल मीडियाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, कोणताही संशयास्पद मजकूर अथवा गैरप्रकार आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असेही त्यांनी सांगितले.








