बेळगाव : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार प्रकाश हुक्केरी यांची नवी दिल्ली येथे कर्नाटक सरकारच्या विशेष प्रतिनिधीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात समन्वय साधण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली असून राज्याच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी त्यांना दिल्ली स्तरावर पाठपुरावा करावा लागणार आहे.

या नियुक्तीनंतर केंद्राकडून कर्नाटकला मिळणाऱ्या आर्थिक वाट्याशी संबंधित विषयांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. वस्तू व सेवा कराच्या नुकसानभरपाईसह कर वाटपातील राज्याचा हक्काचा निधी वेळेत मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रभावी पाठपुरावा करण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर असेल.

याशिवाय केंद्र पुरस्कृत विविध विकास योजनांसाठीचा निधी, तसेच केंद्रातील विविध मंत्रालयांकडे प्रलंबित असलेल्या राज्य सरकारच्या प्रस्तावांना मंजुरी मिळवून देण्यासाठीही त्यांना सक्रिय भूमिका बजवावी लागणार आहे. राज्याच्या विकासकामांना गती देण्यासाठी केंद्र आणि राज्य यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्यावर भर दिला जाणार आहे.

कर्नाटकशी संबंधित म्हादई, कृष्णा आणि कावेरी नदी पाणीवाटप प्रश्न हे राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि संवेदनशील विषय मानले जातात. या प्रकल्पांशी संबंधित पर्यावरणीय आणि प्रशासकीय मंजुरी मिळवून देण्यासाठी केंद्रातील संबंधित विभागांशी सातत्याने समन्वय साधण्याचे कामही विशेष प्रतिनिधी म्हणून त्यांना करावे लागणार आहे.

प्रकाश हुक्केरी यांच्या नियुक्तीमुळे राज्याचे विविध प्रश्न केंद्र सरकारसमोर प्रभावीपणे मांडले जातील आणि प्रलंबित विषयांच्या सोडवणुकीला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.