- महिलांसह नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
- मद्यपींच्या त्रासाला कंटाळून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
बेळगाव : जिल्ह्याच्या सौंदत्ती तालुक्यातील असुंडी गावात सुरू असलेल्या एमएसआयएल (MSIL) दारूच्या दुकानामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत दुकान तात्काळ स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे. मद्यपींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळलेल्या महिला आणि विद्यार्थिनींनी प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.
सौंदत्ती तालुक्यातील असुंडी आणि करकट्टी गावांदरम्यानच्या मुख्य रस्त्यावर हे एमएसआयएल दारूचे दुकान कार्यरत आहे. या ठिकाणाजवळच श्री सद्गुरू आत्मानंद आश्रम आणि श्री सिद्धलिंगेश्वर मंदिर असून, भाविकांसह नागरिकांची या मार्गावरून सतत ये-जा सुरू असते. मात्र, दारूच्या नशेत असलेले काही समाजकंटक या रस्त्यावरून जाणाऱ्या विद्यार्थिनी आणि महिलांची छेड काढत असल्याने परिसरातील शांतता आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
यामुळे असुंडी गावातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून आपली व्यथा मांडली. हे दारूचे दुकान तातडीने अन्यत्र हलविण्यात यावे, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली.
यासंदर्भात माध्यमांशी बोलताना ग्रामस्थ गंगाप्पा ज्ञानप्पा ईनामती यांनी सांगितले की, दारूच्या दुकानामुळे रस्त्यावर वाहतूक आणि गर्दी वाढत असून महिलांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. तसेच किरकोळ अपघातांच्या घटनाही वाढत आहेत. या गंभीर समस्येबाबत तालुका प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभागाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे संतप्त झालेल्या गावातील ज्येष्ठ नागरिक आणि महिला आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि जिल्हाधिकारी यांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन दारूचे दुकान लवकरात लवकर स्थलांतरित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी गावातील नेते, ज्येष्ठ नागरिक तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.







