बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने राबविण्यात येत असलेल्या “कवी समजून घेताना” या उपक्रमांतर्गत शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने सातवे पुष्प म्हणून ‘स्वरूपायन’ हा ज्येष्ठ कवयित्री प्रा. स्वरूपा इनामदार यांच्या कवितांचे काव्यवाचन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. १३ जून २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता सरस्वती वाचनालय, कोरे गल्ली, बेळगाव येथे होणार आहे.

प्रा. स्वरूपा इनामदार या शब्दगंध कवी मंडळ संघाच्या ज्येष्ठ सदस्या असून सरस्वती वाचनालयाच्या अध्यक्षा म्हणूनही त्या साहित्य, वाचनसंस्कृती आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय कार्यरत आहेत. त्यांच्या कवितांमध्ये मानवी भावना, सामाजिक भान, स्त्रीजीवन, नातेसंबंध आणि जीवनमूल्यांचे प्रभावी चित्रण आढळते. त्यांच्या निवडक कवितांचे अभिवाचन या कार्यक्रमात होणार असून रसिकांना त्यांच्या काव्यविश्वाचा जवळून परिचय करून घेण्याची संधी मिळणार आहे.

काव्यवाचनानंतर उपस्थित कवींसाठी खुल्या व्यासपीठावरील कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात स्थानिक कवींना आपल्या स्वरचित कविता सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ काव्यश्रवणापुरता मर्यादित न राहता नवोदित आणि प्रस्थापित कवींमधील साहित्यिक संवादाचे व्यासपीठ ठरणार आहे.

शब्दगंध कवी मंडळ संघाचे अध्यक्ष प्रा. अशोक आलगोंडी व सचिव श्री. सुधाकर गावडे यांनी सर्व साहित्यप्रेमी, कवी, विद्यार्थी, वाचक आणि रसिक नागरिकांनी या साहित्यिक मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.