• खानापूर तालुक्याच्या हुळंद गावातील घटना

खानापूर : तालुक्यातील जांबोटी जवळील हुळंद गावात गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका तरुण शेतकऱ्यावर अस्वलाने अचानक हल्ला केल्याची घटना घडली. या भीषण हल्ल्यात महेश गावडे (वय २५) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बेळगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हुळंद गावचे रहिवासी असलेले महेश गावडे हे नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी जंगल परिसरात गेले होते. संध्याकाळी गुरे घेऊन परतत असताना दाट झुडपात दबा धरून बसलेल्या अस्वलाने त्यांच्यावर अचानक झडप घातली. स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असताना अस्वलाच्या नखांच्या आणि दातांच्या हल्ल्यामुळे त्यांच्या पायाला व कंबरेला गंभीर दुखापत झाली.

महेश यांच्या आरडाओरडीनंतर स्थानिक नागरिक घटनास्थळी धावून आल्याने पुढील अनर्थ टळला. नागरिकांची चाहूल लागताच अस्वल जंगलाच्या दिशेने पळून गेले. जखमी अवस्थेतील महेश यांना तातडीने खानापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र जखमांचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी बेळगावातील खासगी रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जांबोटीसह परिसरातील जंगल भागात वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने या भागातील वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.