• तिघांना अटक ; १२ मोबाईल फोन जप्त
  • पोलिसांकडून चोरीचा मुद्देमाल वारसांकडे सुपूर्द

बेळगाव : यमकनमर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकल चोरीच्या प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी तिघा चोरट्यांना अटक केली आहे. यासोबतच हरवलेले १२ मोबाईल फोन जप्त करून संबंधित मालकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

हुक्केरी तालुक्यातील हंचिनाळ गावातील इरापन्ना सिद्धराई रेवण्णावर यांच्या मोटारसायकल चोरीच्या (प्रकरण क्र. १४४/२०२६) तक्रारीच्या आधारे तपास सुरू करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने तपास करून शंकर भीमा आदिनावर, परशुराम कल्लप्पा शिरनागी आणि परशुराम भरमप्पा पांडी यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली.

दरम्यान, सीईआयआर (CEIR) पोर्टलच्या साहाय्याने तांत्रिक तपास करत जप्त केलेले १२ मोबाईल फोन शोधून काढण्यात आले. हे मोबाईल फोन संबंधित मालकांना पोलीस ठाण्यात बोलावून अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आले.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक बी. के. पाटील, व्ही. डी. गुंजागी, तसेच जी. बी. नागनवर आणि पी. के. किल्लिकेट्टर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.