• पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

बेळगाव : समाजाच्या हितासाठी, जातीय सलोखा वाढवण्यासाठी आणि सोशल मीडियाचा गैरवापर, अमली पदार्थांचे सेवन, जुगार व किरकोळ गुन्हेगारीच्या वाढत्या प्रकरणां विरोधात जनजागृती करण्यासाठी पोलीस आणि नागरी प्रशासनासोबत मिळून काम करा असे आवाहन पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी अल्पसंख्याक समाजाच्या नेत्यांना केले.

अल्पसंख्याकांसाठी पंतप्रधानांच्या १५-कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी नेमण्यात आलेल्या जिल्हा अल्पसंख्याक समितीच्या राज्य सरकारने नामनिर्देशित सदस्यांची बैठक आज मंगळवारी पोलीस आयुक्त कार्यालयात पार पडली.

यावेळी पोलीस आयुक्त बोरसे यांनी तरुण पिढी, विशेषतः ‘जनरेशन झेड’बद्दल चिंता व्यक्त केली.तरुणांना जबाबदार नागरिकत्वाकडे मार्गदर्शन करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी पुढे ते म्हणाले, “’जनरेशन झेड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तरुण पिढीबद्दल मला खूप चिंता वाटते, जे समाजाचे भविष्य घडवू किंवा बिघडवू शकतात.त्यामुळे आपण एकत्र येऊन या तरुणांमध्ये एक चांगला समाज घडवण्यासाठी जनजागृती करु असे ही त्यांनी सांगितले.

अमली पदार्थांचे सेवन, जुगार आणि इतर सामाजिक दुष्कृत्ये रोखण्यासाठी शहर पोलिसांनी हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी उपस्थित सदस्यांना दिली.अल्पसंख्याक नेते आणि समुदाय प्रतिनिधींना जनजागृती मोहिमा आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले. या बैठकीला लुईस रॉड्रिग्स, नियाज सौदागर, शाहिद मेमन आणि परमिंदर भाटिया यांच्यासह शासनाने नामनिर्देशित समितीचे सदस्य उपस्थित होते.

पोलीस उपआयुक्त एन. व्ही. बरमनी आणि जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी विजय प्रकाश पुजेर हे देखील उपस्थित होते.या बैठकीत चर्चेत आलेल्या प्रमुख सूचनांमध्ये मोहल्ला समित्यांची स्थापना, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन, तसेच शहराच्या सामाजिक वातावरणाशी संबंधित समस्या, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, शीख आणि इतर अल्पसंख्याक समुदायांच्या समस्यांचे निराकरण करणे यांचा समावेश होता.