- गुणांच्या आधारावर विजय
- पंजाब केसरी भूपेंद्र अजनालाने दिली कडवी झुंज
बी. के. कंग्राळी : तब्बल ४३ वर्षांनंतर साजऱ्या होत असलेल्या ग्रामदेवी श्री महालक्ष्मी जत्रा महोत्सवानिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इराणचा पैलवान मिर्झा याने गुणांच्या आधारावर विजय मिळवत मैदान गाजवले.
ग्रामदेवी जत्रेच्या निमित्ताने आयोजित या कुस्ती स्पर्धेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले होते. पहिल्याच फेरीतील सर्वाधिक उत्कंठावर्धक लढतीत इराणचा मिर्झा आणि पंजाब केसरी भूपेंद्र अजनाला आमनेसामने आले. अनुभवी दोन्ही पैलवानांनी दमदार खेळ करत प्रेक्षकांना खिळवून ठेवले. भूपेंद्रने कडवी झुंज दिली असली, तरी निर्धारित वेळेत निकाल स्पष्ट न झाल्याने अखेरीस गुणांच्या आधारे मिर्झाला विजेता घोषित करण्यात आले.
सुमारे चार दशकांनंतर कंग्राळी गावात आयोजित करण्यात आलेल्या या महालक्ष्मी जत्रेमुळे धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणाला क्रीडा स्पर्धेची जोड मिळाली. कुस्ती सामने पाहण्यासाठी परिसरातील हजारो कुस्तीप्रेमी दाखल झाले होते.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील पैलवानांची कामगिरी पाहून उपस्थितांनी दाद दिली. धार्मिक विधींसह पार पडणाऱ्या या महोत्सवात कुस्ती स्पर्धेमुळे विशेष रंगत निर्माण झाली असून गावात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.







