- शहरातील चार पोलीस ठाण्यांतून स्वतंत्र छापे घालून कारवाई
बेळगाव : शहरात अवैध कृत्यांविरोधात पोलिसांनी मोहीम तीव्र करत मटका व्यवसाय आणि अंमली पदार्थांच्या सेवनावर कारवाई करत पाच जणांना अटक केली आहे. विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनी स्वतंत्र छापे घालून ही कारवाई केली.
मार्केट पोलीस ठाण्याचे पीएसआय विठ्ठल हावन्नावर यांच्या पथकाने भरतेश स्कूलजवळ मटका खेळणाऱ्या प्रभाकर जाधव याला अटक केली. तसेच हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे पीआय सुंदरेश होळेन्नावर यांच्या पथकाने जनता हॉटेल परिसरात कारवाई करत अमित महादेव शेटवे याला ताब्यात घेतले.
अंमली पदार्थांविरोधात मरिहाळ पोलीस ठाण्याचे पीएसआय मंजुनाथ हुलकुंद यांच्या पथकाने गांजाचे सेवन केल्याप्रकरणी विनायक फकिरा राजगोळी आणि गजानन अशोक आगसीमनी यांना अटक केली. दरम्यान, खडेबाजार पोलीस ठाण्याचे एएसआय जे. आय. देवडी यांनी रेल्वे स्टेशन रोडवर संशयास्पद वर्तन करणाऱ्या श्रेयस अनंत मांजरेकर याला वैद्यकीय तपासणीनंतर ताब्यात घेतले असून त्याने गांजाचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले.
या सर्व आरोपींविरुद्ध केपी कायदा आणि एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.








