• राज्यातील अनेक आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

बेंगळूर : राज्य पोलीस विभागात महत्त्वपूर्ण फेरबदल करण्यात आला असून, सरकारने अनेक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. बेळगाव उत्तर विभागाचे आयजीपी म्हणून कार्यरत असलेले डॉ. चेतन सिंग राठोड यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी संदीप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कर्नाटक सरकारने बुधवारी जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, २००४ बॅचचे आयपीएस अधिकारी संदीप पाटील हे बेळगाव उत्तर विभागाचे नवे पोलीस महानिरीक्षक (आयजीपी) म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. सध्या या पदावर कार्यरत असलेले डॉ. चेतन सिंग राठोड यांची सीआयडी आर्थिक गुन्हे शाखेच्या आयजीपीपदी बदली करण्यात आली आहे.

याचबरोबर, नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनुपम अग्रवाल यांच्याकडे कर्नाटक राज्य राखीव पोलीस दल (केएसआरपी) आयजीपीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रशासनाच्या हितासाठी या सर्व बदल्या तात्काळ प्रभावाने लागू करण्यात येणार असल्याचे शासनाचे अप्पर सचिव संजय बी. एस. यांनी आदेशात नमूद केले आहे.

बेळगावच्या इतिहासात एसपी म्हणून काम केल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी पदोन्नतीवर ‘आयजीपी’ म्हणून ‘री-एन्ट्री’ करणारे ते पहिलेच वरिष्ठ अधिकारी ठरलेआहेत.गेल्या १५ वर्षांत त्यांनी बेंगळुरू शहर आणि राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागात अनेक महत्त्वाची पदे भूषवली असून, त्यांचा तो प्रदीर्घ अनुभव आता बेळगाव जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर परीक्षेत्रासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. ‘सिंघम इज बॅक’ अशा घोषणांसह सोशल मीडियावर बेळगावकरांनी त्यांच्या या नियुक्तीचे जंगी स्वागत केले असून, त्यांच्या आगमनामुळे गुन्हेगारी जगतात पुन्हा एकदा धडकी भरली आहे, तर सर्वसामान्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.