- चिक्कोडी तालुक्याच्या इंगळी गावातील दुर्दैवी घटना
- खेळताना झाला अपघात
चिक्कोडी : तालुक्यातील इंगळी गावात विजेचा धक्का लागून ९ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. मृत मुलीचे नाव सान्वी कांबळे (वय ९) असून ती येथील शासकीय प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरीत शिक्षण घेत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सान्वी काल सायंकाळी घरी खेळत असताना दोरीउडीची दोरी घरावरील विजेच्या तारेवर अडकली. ती दोरी काढण्यासाठी वरच्या मजल्यावर गेली असता तिला विजेचा जोरदार धक्का बसला. त्यानंतर ती छतावरून खाली कोसळली.
घटनेनंतर तिला तातडीने जवळील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी अंकली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.








