सौंदत्ती : तालुक्यातील अलडकट्टी गावात कौटुंबिक वादातून जावयाने सासूवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.जखमी महिलेची ओळख महादेवी कारीगार (वय ४५) अशी असून आरोपी अरविंद गवळी (वय २६) याला अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, सुमारे दीड वर्षांपूर्वी महादेवी यांच्या मुलीचे लग्न अरविंद गवळी याच्यासोबत झाले होते. दोन महिन्यांपूर्वी मुलीने बाळाला जन्म दिल्यानंतर ती माहेरी राहत होती. या दरम्यान आरोपी वारंवार व्हिडिओ कॉल करून बाळ दाखवण्याची मागणी करत होता. मात्र घरकामामुळे सतत मोबाईल वापरणे शक्य नसल्याचे सांगितल्याने दोघांमध्ये वाद झाला.
या वादातूनच संतप्त झालेल्या अरविंदने अलडकट्टी येथील महादेवी यांच्या घरी जाऊन त्यांच्यावर चाकूने हल्ला करून पसार झाला.घटनेनंतर जखमी महादेवी यांना तातडीने बेळगाव येथील बीम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.माहिती मिळताच मुरुगोड पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन तपास करत आरोपीला अटक केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.








