- १.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
बेळगाव : औद्योगिक परिसरातील पार्वतीनगर बस स्थानकाजवळ गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी धाड टाकत दोघा तरुणांना अटक केली. या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, अंमली पदार्थविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
दि. ०२ मे २०२६ रोजी मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक पी. ए. गंधवगोळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तात्काळ छापा टाकला. यावेळी उचगाव येथील गुंडू कोवाडकर (वय २२) आणि प्रज्वल ज्ञानेश कांबळे यांना ताब्यात घेण्यात आले.त्यांच्याकडून सुमारे २६,७५० रुपये किमतीचा ५३५ ग्रॅम गांजा, ४०,००० रुपये किमतीची मोटारसायकल, ६५,००० रुपये किमतीची सायकल, दोन मोबाईल फोन आणि ५२० रुपये रोख रक्कम असा एकूण १,३२,२७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी उद्यमबाग पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. शहर पोलीस आयुक्त व उपायुक्तांनी या कारवाईबद्दल पथकाचे कौतुक केले आहे.








