• विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
  • भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती अपेक्षित

चलवेनहट्टी : येथील ब्रम्हलिंग मंदिराचा तिसरा वर्धापनदिन सोहळा यावर्षीही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. २०२३ साली नव्या मंदिराच्या वास्तूशांतीनंतर दरवर्षी मे महिन्यात ४ आणि ५ मे रोजी वर्धापनदिन साजरा करण्याचा निर्णय ब्रम्हलिंग देवस्थान जिर्णोद्धार समिती व ग्रामस्थांनी घेतला होता. त्यानुसार हा सोहळा दरवर्षी उत्साहात पार पडत आहे.

या यात्रेनिमित्त स्थानिकांसह कामानिमित्त बाहेरगावी स्थायिक झालेले ग्रामस्थही मोठ्या संख्येने गावात दाखल होत असल्याने गावात सणासारखे वातावरण निर्माण होते.

सोहळ्यानिमित्त ४ मे रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत स्वराली संगीत कला मंच यांच्यावतीने संगीत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर ब्रम्हलिंग भजनी मंडळ, चलवेनहट्टी यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे.

५ मे रोजी पहाटे ६ वाजता मंदिरात अभिषेक करण्यात येणार असून त्यानंतर मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले राहणार आहे. सकाळी भजन कार्यक्रमासोबत दुपारी ‘राजा पंढरीचा’ महिला हरीपाठ मंडळाच्या वतीने हरीपाठ होणार आहे. दुपारी १२ वाजता महाप्रसादास सुरुवात होणार आहे.

या वर्धापनदिनानिमित्त गावात उत्साहाचे वातावरण असून, सर्व भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा व विविध कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन ब्रम्हलिंग देवस्थान जिर्णोद्धार समितीने केले आहे.