बेळगाव : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या विजयाचा आनंद शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भाजप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केला, तर शहरातून भव्य बाईक रॅली काढत विजय साजरा केला.
राज्य उपाध्यक्ष व माजी आमदार अनिल बेनके यांनी या विजयाबद्दल समाधान व्यक्त करत मतदारांचे आभार मानले. पश्चिम बंगालसह विविध राज्यांमध्ये मिळालेला पाठिंबा हा पक्षाच्या धोरणांवर जनतेने दाखवलेला विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.
शहराध्यक्ष गीता सुतार यांनी हा विजय ऐतिहासिक असल्याचे नमूद करत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्वप्न साकार होत असल्याचे सांगितले.
भाजप नेते डॉ. रवी पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत या विजयाला निर्णायक ठरवले. आसाम, पाँडिचेरी आणि पश्चिम बंगालमधील यशामुळे पक्षाची ताकद अधिक वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुरुगेंद्रगौडा पाटील यांनीही या विजयामुळे पक्षाची ताकद अधिक दृढ झाल्याचे सांगितले. यावेळी भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








