- २.१४ लाख मताधिक्याने विरोधकांवर मात
- अजित पवारांचा विक्रम मोडला
बारामती : बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तब्बल २ लाख १४ हजार ९३ मताधिक्याने दणदणीत विजय मिळवत नवा विक्रम प्रस्थापित केला. त्यांना २ लाख १८ हजार ९३० मते मिळाली, तर विरोधातील २२ उमेदवार आणि ‘नोटा’ यांना मिळून केवळ ४८३७ मतांवर समाधान मानावे लागले.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०१९ मध्ये प्रस्थापित केलेला मताधिक्याचा विक्रम यावेळी मोडीत निघाला. त्यावेळी त्यांनी १ लाख ६५ हजार २६५ मताधिक्याने विजय मिळवला होता. सुनेत्रा पवार यांनी हा विक्रम मोठ्या फरकाने मागे टाकत ऐतिहासिक कामगिरी केली.
अजित पवार यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असे प्रयत्न झाले होते. मात्र २२ उमेदवारांनी माघार न घेतल्याने मतदान झाले. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार विक्रमी मताधिक्य मिळवतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.मतदानात सुमारे ५८.२७ टक्के मतदान झाले. एकूण ३ लाख ८४ हजार ५७९ मतदारांपैकी २ लाख २४ हजार ८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
एमआयडीसी येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणी पार पडली. पहिल्या फेरीपासूनच सुनेत्रा पवार आघाडीवर राहिल्या. पहिल्या फेरीत ६५०० मते मिळवत त्यांनी आघाडी घेतली, तर दुसऱ्या, तिसऱ्या आणि पुढील फेऱ्यांमध्ये ही आघाडी वाढतच गेली. अखेर २४ व्या फेरीअखेर त्या विक्रमी मतांनी विजयी घोषित झाल्या.
या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांचा एकही उमेदवार नव्हता. नोंदणीकृत पक्ष व अपक्ष मिळून एकूण २३ उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये विविध अपक्ष उमेदवारांसह काही लहान पक्षांचे उमेदवार होते.
- ‘अजित पवारांच्या स्मृतींना विजय समर्पित’ :
विजयानंतर सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांना जल्लोष न करण्याचे आवाहन केले. “हा विजय अजितदादांच्या स्मृतींना समर्पित आहे. कुणीही मिरवणुका काढू नयेत, गुलाल उधळू नये आणि संयम राखावा,” असे त्यांनी नमूद केले.








