• चौथे जेएमएफसी न्यायालयाचा निकाल 
  • सरकारी पक्षाला आरोप सिद्ध करण्यात अपयश

बेळगाव : व्हॅक्सिन डेपो मैदानावर २०१७ मध्ये विनापरवानगी महामेळावा भरविल्याप्रकरणी टिळकवाडी पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेत्यांची चौथे जेएमएफसी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. सरकारी पक्षाला आरोप सिद्ध करण्यात अपयश आल्याने न्यायालयाने हा निर्णय दिला.

या प्रकरणात मध्यवर्ती म. ए. समितीचे दिवंगत अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर आणि खजिनदार प्रकाश मरगाळे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

१३ नोव्हेंबर २०१७ रोजी हलगा येथील सुवर्ण विधानसौध येथे कर्नाटक सरकारचे अधिवेशन सुरू असताना त्याला विरोध म्हणून व्हॅक्सिन डेपो मैदानावर मराठी भाषिक महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी प्रशासनाकडे अर्ज करण्यात आला होता; मात्र परवानगी नाकारण्यात आली होती. त्याचवेळी १२ ते १४ नोव्हेंबरदरम्यान शहरात कलम १४४ लागू करण्यात आले होते.

तरीही १३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत महामेळावा घेण्यात आल्याने जमावबंदीचे उल्लंघन, रस्त्यावर व्यासपीठ उभारणे, वाहतुकीस अडथळा निर्माण करणे आणि भाषणांमुळे तणाव निर्माण झाल्याचा ठपका ठेवत तत्कालीन पोलीस निरीक्षक मोनेश देशमुख यांनी गुन्हा दाखल केला होता.

या खटल्यात सरकारतर्फे आठ साक्षी नोंदविण्यात आल्या. मात्र पुरावे ठोस नसल्याने आरोप सिद्ध करण्यात अपयश आले. पोलिसांकडून व्हिडिओ शूटिंग, वर्तमानपत्रांचे पुरावे तसेच वापरलेले ध्वनीप्रणाली साहित्य न्यायालयासमोर सादर करण्यात आले नव्हते, ही बाब बचाव पक्षाने अधोरेखित केली.

समितीच्या वतीने ॲड. महेश बिर्जे, ॲड. एम. बी. बोंद्रे, ॲड. बाळासाहेब कागणकर, ॲड. वैभव कुट्रे, ॲड. अश्वजीत चौधरी आणि ॲड. रिचमॅन रिकी यांनी काम पाहिले.