बेळगाव : शहर आणि परिसरात अंगारकी संकष्टी चतुर्थी भक्ती भावाने साजरी करण्यात आली. यावर्षी आलेल्या दुर्मिळ योगावर वर्षातील दुसरी अंगारकी संकष्टी साजरी करण्यासाठी भक्तांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसून येत होता. पहाटेपासूनच गणेश मंदिरांमध्ये भक्तांच्या गर्दीच्या रांगा लागल्या होत्या. भक्तगण गणेश दर्शनासाठी उत्सुक होते दिवसभर उपास करून त्यानंतर रात्री चंद्रोदय झाल्यानंतर उपवास सोडण्याचा संकल्प करण्यात आला होता. दिवसभर साबुदाणा आणि फलाहार यावर भक्तांचा भर दिसून आला. शहर आणि उपनगरांमध्ये विविध ठिकाणी असलेल्या जागृत गणेश देवस्थानामध्ये मध्ये दिवसभर पूजा आणि अभिषेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.