• व्हीआयपी दर्शन बंदचा सकारात्मक परिणाम
  • आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी
  • भाविकांना जलद दर्शनासाठी सुरक्षाव्यवस्था आणखी मजबूत करण्याच्या सूचना

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद करण्यात आल्याने दर्शनरांगेतील भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पूर्वी पदस्पर्श दर्शनासाठी आठ ते दहा तास प्रतीक्षा करावी लागत असताना आता ही प्रतीक्षा सुमारे चार तासांवर आली असून भाविकांना अधिक सुलभ आणि जलद दर्शनाचा लाभ मिळत आहे.

२५ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी शुद्ध एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन दर्शनरांगेतील भाविकांना कोणताही अडथळा न येता दर्शन मिळावे, यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी व्हीआयपी दर्शन सुविधा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, याची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी स्वेरी महाविद्यालयापासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापर्यंत पायी पाहणी केली. यावेळी त्यांनी मंदिर समितीने दर्शनरांग आणि पत्राशेड परिसरात भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा आढावा घेतला.

दर्शनासाठी आलेल्या भाविकांशी संवाद साधत त्यांनी दर्शन व्यवस्थेबाबत तसेच उपलब्ध सुविधांबाबत प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली. दर्शनरांगेत घुसखोरी होऊ नये, यासाठी आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करून व्यवस्था अधिक काटेकोर करण्याच्या सूचनाही त्यांनी मंदिर समितीला दिल्या.

व्हीआयपी दर्शन बंद झाल्यामुळे सामान्य भाविकांना जलद दर्शन मिळत असल्याचे समाधान अनेकांनी व्यक्त केले असून, आषाढी यात्रेदरम्यानही ही व्यवस्था प्रभावीपणे कायम ठेवण्याची अपेक्षा भाविकांकडून व्यक्त होत आहे.