• सोशल वर्कर रेस्क्यू टीम, एसडीआरएफ आणि अग्निशमन दलाची संयुक्त मोहीम

गोकाक : गोकाक परिसरात सायंकाळी फिरण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा पाय घसरून पाण्यात पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बेळगाव येथील सोशल वर्कर रेस्क्यू टीम, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) आणि गोकाक अग्निशमन दलाने संयुक्तपणे शोधमोहीम हाती घेत मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवले.

घटनेची माहिती मिळताच रात्री उशिरा सोशल वर्कर रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर एसडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांसह समन्वय साधत शोधकार्य सुरू करण्यात आले. अंधार, पाण्याचा वेग आणि प्रतिकूल परिस्थिती असूनही सर्व यंत्रणांनी अथक प्रयत्न करत युवकाचा मृतदेह शोधून बाहेर काढला.

या बचाव मोहिमेत सोशल वर्कर रेस्क्यू टीमचे अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हुली, निलेश हिरेहोळी आणि मायकेल पिंटो यांनी धाडस, तत्परता आणि सेवाभावाचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले. त्यांच्या कार्याचे स्थानिक नागरिकांसह प्रशासनानेही कौतुक केले.

या दुर्दैवी घटनेनंतर बचाव पथकाने नागरिक आणि पर्यटकांना पावसाळ्यात जलाशय परिसरात विशेष सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. धबधबे, नद्या, तलाव किंवा इतर पाणवठ्यांच्या परिसरात अनावश्यक धाडस टाळावे, पाण्याचा वेग आणि खोलीचा अंदाज नसल्यास पाण्यात उतरू नये तसेच प्रशासनाने जारी केलेल्या सुरक्षा सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.