- मुख्य आरोपीला अटक ; ५.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
बैलहोंगल : बैलहोंगल तालुक्यातील चिवतगुंडी गावात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावत आरोपीला अटक केली. आरोपीकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे ५ लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
महांतेश बसप्पा बोगूर आणि त्यांचे कुटुंबीय शेतात कामासाठी गेले असताना त्याच गावातील प्रकाश रायप्पा मुल्ला (वय ४०) याने त्यांच्या घरात घुसून चोरी केली. आरोपीने घरातील सुमारे ५८ ग्रॅम वजनाचे अंदाजे ५.४९ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच ४८ हजार रुपयांची रोकड लंपास केली होती.
याप्रकरणी महांतेश बोगूर यांनी बैलहोंगल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस उपअधीक्षक डॉ. वीरय्या हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद सी. यलिगार आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला.
तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपीचा माग काढत त्याला अटक केली. त्याच्याकडून चोरीस गेलेले सर्व सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
या जलद आणि प्रभावी कारवाईबद्दल बेळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी बैलहोंगल पोलीस पथकाचे अभिनंदन करून त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.







