- मार्केट पोलिसांकडून दोघांना अटक
बेळगाव : बनावट कागदपत्रे, खोटा कुलमुखत्यारनामा आणि बनावट स्वाक्षरीच्या आधारे दुसऱ्याची मालमत्ता बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना बेळगावच्या मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. उपनिबंधक कार्यालयात खोटी ओळख निर्माण करून मालमत्तेच्या व्यवहाराचा प्रयत्न करण्यात आल्याचे तपासात उघड झाल्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
कडोली येथील परशुराम दुडुम यांनी दिलेल्या तक्रारीनंतर मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारीनुसार, बनावट कागदपत्रे तयार करून खोटी स्वाक्षरी आणि बनावट छायाचित्रांचा वापर करत दुसऱ्या व्यक्तीला मूळ मालक म्हणून उभे करण्यात आले होते. या माध्यमातून मालमत्ता बळकावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी दस्तऐवजांवरील छायाचित्रे आणि इतर पुराव्यांच्या आधारे शोधमोहीम राबवत मुख्य संशयित इसाक इस्माईल मुजावर आणि नागराज रामचंद्र कडकोळ यांना अटक केली. दोघांनाही न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
तपासात असेही समोर आले की, अटक करण्यात आलेल्या नागराज कडकोळ याच्याविरुद्ध यापूर्वी अंकोला पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल असून तो त्या प्रकरणात जामिनावर बाहेर होता.
मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमिरची आणि पीएसआय एच. एल. केरूळ यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्ता हडपण्याचा डाव उधळून लावल्याबद्दल बेळगावचे पोलीस आयुक्तांनी संबंधित पोलिसांचे कौतुक केले आहे.







