- कक्केरी परिसरात हळहळ ; शेतातील काम करताना पाय घसरला
- कुटुंबावर आर्थिक संकट
कक्केरी : येथील प्रगतशील शेतकरी मल्लय्या दुंडय्या हिरेमठ (वय ५२) यांचा स्वतःच्या शेतातील कृषी तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. शेतातील काम सुरू असताना पाय घसरून ते पाण्यात पडल्याने हा अपघात झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून हिरेमठ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मल्लय्या हिरेमठ हे नेहमीप्रमाणे सकाळी शेतात गेले होते. कृषी तलावाच्या परिसरात वाढलेले गवत आणि कचरा साफ करत असताना त्यांचा अचानक तोल गेला आणि ते तलावात पडले. त्यांना पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मल्लय्या हिरेमठ यांच्या पश्चात पत्नी भारती (वय ४५), बी.एस्सी. नर्सिंगच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणारी मुलगी ऐश्वर्या (वय २०) आणि डिप्लोमाच्या प्रथम वर्षात शिक्षण घेणारा मुलगा अक्षय (वय १७) असा परिवार आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह पूर्णपणे शेतीवर अवलंबून होता. त्यांच्या नावावर सरकारी बँक तसेच कृषी पतसंस्थेचे लाखो रुपयांचे पीककर्ज असल्याने कर्ता पुरुष गमावलेल्या कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
योगायोगाने ही घटना ‘शेतकरी हुतात्मा दिना’च्या दिवशीच घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच शेतकरी नेते यल्लप्पा गुपीत, रमेश वीरापूर, अश्पाक अहमद पटेल, महांतय्या हिरेमठ, चेन्नवीरय्या हिरेमठ, अलेक्झांडर डिसोजा, मारुती पाटील, यल्लेशी कुंभारकोप, शिवाजी अंबडगट्टी आणि यल्लप्पा चन्नापूर यांनी मृताच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच शासनाकडे पाठपुरावा करून कुटुंबाला आर्थिक मदत आणि योग्य भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
दरम्यान, या घटनेची नोंद नंदगड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक रविकुमार धर्मट्टी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.







