• ७ ऑगस्टला संसदेला घेरावाचा इशारा

बेळगाव : विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेळगावमध्ये बीएसएनएल (BSNL) कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी धरणे आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले. रखडलेली वेतनवाढ, पेन्शन दुरुस्ती आणि बीएसएनएलची ४जी सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

आंदोलकांनी सांगितले की, गेल्या नऊ वर्षांपासून वेतनवाढीचा प्रश्न प्रलंबित असून, पेन्शनधारकांच्या मागण्यांकडेही दुर्लक्ष केले जात आहे. तसेच बीएसएनएलला खाजगी दूरसंचार कंपन्यांप्रमाणे आधुनिक उपकरणे खरेदी करण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून ग्राहकांना अधिक दर्जेदार सेवा उपलब्ध करून देता येईल, अशी मागणीही करण्यात आली.

मागण्यांवर लवकर निर्णय न झाल्यास येत्या ७ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील संसद भवनाला घेराव घालण्यात येईल, असा इशारा कर्मचारी संघटनेचे नेते अरविंद चौगुले आणि रामू तटपटी यांनी दिला.

या आंदोलनात बीएसएनएलचे कर्मचारी, अधिकारी आणि पेन्शनधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी सरकारने कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.