- केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
बेळगाव : देशभरात गाजत असलेल्या नीट परीक्षा प्रश्नपत्रिका गळती आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांचा निषेध करण्यासाठी युथ काँग्रेस आणि विद्यार्थ्यांनी बेळगावात तीव्र आंदोलन छेडले. दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
बेळगावातील राणी चन्नम्मा चौकात युथ काँग्रेसचे नेते अमान सेठ यांच्या नेतृत्वाखाली शेकडो विद्यार्थी, पालक आणि कार्यकर्ते एकत्र आले होते. मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा तसेच योग्य आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आंदोलकांनी आरोप केला की, गेल्या दहा वर्षांत विविध स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिका १५० हून अधिक वेळा फुटल्या असून, अलीकडील काळातही ७० पेक्षा अधिक गैरप्रकार समोर आले आहेत. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली.
मुसळधार पावसातही विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले. गरीब, शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी मोठे त्याग करत असताना परीक्षांतील गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली. तसेच शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जाचाही त्यांनी निषेध नोंदवला.
युथ काँग्रेसचे नेते अमान सेठ यांनी सांगितले की, लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये केवळ २२ कायमस्वरूपी सरकारी कर्मचारी असून उर्वरित कर्मचारी कंत्राटी आहेत. त्यामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. हे आंदोलन कोणत्याही राजकीय हेतूने नसून विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.








