• २३ ते २८ जुलैदरम्यान सहा फेऱ्या
  • बेळगावसह उत्तर कर्नाटकातील भाविकांना मोठा दिलासा

बेळगाव : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी दक्षिण पश्चिम रेल्वेकडून धारवाड-बेळगाव-पंढरपूर विशेष रेल्वे आजपासून सुरू करण्यात आली आहे. बेळगाव, धारवाड, हुबळी आणि परिसरातील हजारो भाविकांची दरवर्षी होणारी गैरसोय लक्षात घेऊन ही विशेष सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून, २३ ते २८ जुलैदरम्यान ही रेल्वे एकूण सहा फेऱ्या करणार आहे.

या विशेष रेल्वेत एकूण १० डबे असून त्यापैकी ८ जनरल आणि २ स्लीपर कोचचा समावेश आहे. बेळगावहून पंढरपूरसाठी थेट रेल्वेची अनेक वर्षांपासून मागणी होत होती. या विशेष सेवेच्या माध्यमातून भाविकांना अधिक सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

सकाळी ६ वाजता धारवाड येथून सुटणारी विशेष एक्स्प्रेस सकाळी ७.४९ वाजता खानापूर, ८.३० वाजता बेळगाव, ९.३० वाजता घटप्रभा, दुपारी १२.२० वाजता मिरज येथे पोहोचून सायंकाळी ४.५० वाजता पंढरपूर येथे दाखल होईल.

परतीच्या प्रवासात ही रेल्वे सायंकाळी ६.४० वाजता पंढरपूरहून सुटेल. त्यानंतर मध्यरात्री १.२० वाजता बेळगावला, तर पहाटे ४.३० वाजता धारवाडला पोहोचणार आहे.

ही विशेष रेल्वे धारवाड, लोंढा, खानापूर, देसूर, बेळगाव, पाच्छापूर, गोकाक रोड, घटप्रभा, चिकोडी रोड, रायबाग, कुडची, उगार, शेडबाळ, विजापूर, मिरज, अरग, सांगोला आणि पंढरपूर या स्थानकांवर थांबणार असल्याने उत्तर कर्नाटकातील तसेच सीमाभागातील भाविकांना याचा मोठा लाभ होणार आहे.