• ६ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य पदकांची ऐतिहासिक कमाई

बेळगाव : एनके एज्युकेशन फाउंडेशनचा विद्यार्थी अनिश अनिरुद्ध कोरे याने बेंगळुरू येथे झालेल्या NRJ स्टेट ज्युनियर स्विमिंग चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी करत तब्बल ८ पदके जिंकून संस्थेचे आणि बेळगावचे नाव उज्ज्वल केले. १३ ते १६ जुलैदरम्यान पार पडलेल्या चार दिवसीय राज्यस्तरीय स्पर्धेत अनिशने ६ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य पदकांची कमाई करत जलतरण तलावात आपले वर्चस्व सिद्ध केले.

बटरफ्लाय आणि फ्रीस्टाईल प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत अनिशने वैयक्तिक तसेच सांघिक गटात उल्लेखनीय यश मिळवले. २०० मीटर आणि १०० मीटर बटरफ्लाय स्पर्धेत सुवर्णपदके जिंकत त्याने या प्रकारातील आपली गुणवत्ता अधोरेखित केली. तसेच १०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये रौप्य, तर ५० मीटर बटरफ्लायमध्ये कांस्य पदक पटकावले.

सांघिक स्पर्धांमध्येही अनिशने मोलाची भूमिका बजावत ४×१०० मीटर मेडले रिले, ४×१०० मीटर फ्रीस्टाईल रिले, ४×१०० मीटर मिक्स्ड फ्रीस्टाईल रिले आणि ४×२०० मीटर फ्रीस्टाईल रिले या चारही प्रकारांत आपल्या संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले.

एकूण आठ पदकांच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे राज्यस्तरावर अनिशची ओळख अधिक भक्कम झाली असून, तो कर्नाटकमधील आश्वासक युवा जलतरणपटूंमध्ये अग्रस्थानी पोहोचला आहे.

अनिशच्या या यशाबद्दल एनके एज्युकेशन फाउंडेशनच्या व्यवस्थापन, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव आणि जिद्दीच्या बळावर मिळवलेले हे यश संस्थेतील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.