बेळगाव : विणकर समाजाच्या प्रलंबित प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कर्नाटक राज्य विणकर सेवा संघाने आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. बेळगाव येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ३ डिसेंबर रोजी सुवर्ण विधानसौधसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

विणकर व्यवसायाशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी संघटनेची मागणी आहे. हातमाग व वस्त्रोद्योग विकास विभागासाठी किमान १,५०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करावी, विभागातील रिक्त असलेली ५५ पदे त्वरित भरावीत आणि शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील विणकरांपर्यंत पोहोचवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

विणकरांना बांधकाम कामगारांप्रमाणे विविध शासकीय सुविधा आणि ओळखपत्रे उपलब्ध करून द्यावीत. सहकारी तसेच राष्ट्रीयीकृत बँकांकडून घेतलेल्या कर्जाची संपूर्ण माफी करावी, ५५ वर्षांवरील विणकरांना दरमहा किमान पाच हजार रुपये निवृत्तीवेतन द्यावे, अशी मागणीही संघटनेने केली आहे. तसेच आत्महत्या केलेल्या विणकरांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.

‘विणकर सन्मान’ योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत दहा हजार रुपयांपर्यंत वाढवावी. सध्या दोन लाख रुपये असलेली शून्य व्याजदराच्या कर्जाची मर्यादा पाच लाख रुपये करावी आणि या कर्जाला जीएसटीमधून सूट द्यावी, असेही संघटनेने निवेदनात नमूद केले आहे.

या मागण्यांसंदर्भात बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. ३ डिसेंबरच्या आंदोलनात राज्यातील सर्व जिल्ह्यांतील विणकरांनी सहभागी होऊन एकजूट दाखवावी, असे आवाहन संघटनेने केले आहे. सरकारने मागण्यांची गांभीर्याने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

यावेळी चेतन मानवी, बसवराज जमखंडी, गंगाप्पा वंटगुडी, संगप्पा उदगट्टी, राजेंद्र मिर्जी यांच्यासह विणकर संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.