• कर्ले येथे काव्यसंमेलन उत्साहात
  • कवींना सन्मान देणारा समाजच खऱ्या अर्थाने श्रीमंत
  • माजी महापौर मालोजीराव अष्टेकर

कावळेवाडी : मराठी भाषा आणि साहित्य समृद्ध करण्यामध्ये कवींचे योगदान मोलाचे आहे. विविध विषयांवरील आपल्या संवेदनशील भावना कवी कवितेतून व्यक्त करतात आणि आपल्या शब्दसामर्थ्याने रसिकांची मने जिंकतात. ज्या समाजात कवींचा सन्मान केला जातो, तोच समाज खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो. अशा साहित्यिक उपक्रमांमुळे मराठी भाषेच्या संवर्धनाला चालना मिळते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आपल्या अनुभवांना लेखणीद्वारे अभिव्यक्त करण्याची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी केले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेच्या वतीने माध्यमिक विद्यालय, कर्ले येथे आयोजित निमंत्रित कवींच्या संमेलनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. या संमेलनाला कवी, साहित्यप्रेमी, पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. आर. सांबरेकर होते. प्रारंभी शाळेतील विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. क्रीडा शिक्षक प्रकाश शेळके आणि निवृत्त शिक्षक नागेश पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

प्रास्ताविकात वाय. पी. नाईक यांनी मराठी भाषेचा अभिमान प्रत्येकाने बाळगण्याची गरज व्यक्त केली. वाचन, लेखन, चिंतन आणि मनन या सवयी विद्यार्थ्यांमध्ये रुजणे आवश्यक असून, शालेय जीवनापासूनच मराठी पुस्तकांच्या वाचनाची आवड निर्माण व्हावी, असे त्यांनी सांगितले. यावेळी संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

काव्यसंमेलनात सीमाभागातील निमंत्रित कवींनी विविध विषयांवरील आशयपूर्ण आणि लयबद्ध कविता सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. शिवाजी शिंदे, बसवंत शहापूरकर, सीमा कणबरकर, सुधाकर गावडे, मधु पाटील, रोशनी हुंदरे, प्रा. मनीषा नाडगौडा, शंकर चौगुले, गुरुनाथ किरमटे, चंद्रशेखर गायकवाड, वाय. पी. नाईक आणि सूरज मोरे यांनी आपल्या कवितांतून सामाजिक वास्तव, मानवी भावना, नातेसंबंध, बालपण आणि मराठी अस्मितेचे विविध पैलू उलगडले.

बसवंत शहापूरकर यांनी ‘बालपण’ ही कविता सुरेल आवाजात सादर करून उपस्थितांना बालपणीच्या आठवणींत रमवले. आईच्या डोळ्यांतील दारिद्र्याचे प्रतिबिंब आणि चटणी-भाकरीतील समाधान व्यक्त करणाऱ्या त्यांच्या कवितेला चांगली दाद मिळाली. सीमा कणबरकर यांनी ‘स्वार्थाचा बाजार’ आणि ‘चालायचे एकट्याने’ या कवितांतून मानवी स्वार्थ, बदलती नाती आणि आयुष्यातील संघर्ष प्रभावीपणे मांडला.

प्रा. मनीषा नाडगौडा यांनी ‘विद्यार्थी’ या कवितेतून विद्यार्थिजीवनाचे चित्र उभे केले, तर शिवाजी शिंदे यांनी ‘झालाच पाहिजे’ या कवितेतून मराठी माणसाचे जगणे आणि त्याच्या भावभावना व्यक्त केल्या. गुरुनाथ किरमटे यांनी ‘कलियुग’ आणि ‘मराठीचा सेवेकरी’ या कवितांच्या माध्यमातून संमेलनात रंगत आणली. रोशनी हुंदरे यांनी ‘रावण’ या कवितेतून आजच्या काळात स्त्रीला सहन कराव्या लागणाऱ्या संघर्षावर भाष्य केले. मधु पाटील यांनी ‘माझी शाळा’ या कवितेतून शालेय जीवनातील रम्य आठवणींना उजाळा दिला.

शिवाजी शिंदे यांनी आपल्या ओघवत्या आणि उत्स्फूर्त निवेदनशैलीने संपूर्ण काव्यमैफलीची रंगत वाढवली. विद्यार्थ्यांनीही या कविसंमेलनाचा मनमुराद आनंद घेत समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. के. एम. सातेरी यांनी केले, तर के. जी. मेणसे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वाय. एन. बुरुड, वीणा गोजेकर, पूजा डेळेकर, जोतिबा कदम आणि शुभम पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी पालक, विद्यार्थी आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.