• विधानसभा अध्यक्ष जी. एस. पाटील यांची माहिती
  • विकासाच्या मुद्द्यांवर अर्थपूर्ण चर्चेवर भर

बेळगाव : सुवर्ण विधानसौध येथे २ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उत्तर कर्नाटकातील प्रलंबित प्रश्न आणि विकासाच्या मुद्द्यांना विशेष महत्त्व दिले जाणार आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकत्रितपणे या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सकारात्मक चर्चा करावी, यावर भर राहणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष जी. एस. पाटील यांनी स्पष्ट केले.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष जी. एस. पाटील आणि विधान परिषद सभापती सलीम अहमद यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अधिवेशनासाठी करण्यात आलेल्या निवास, भोजन, वाहतूक, सुरक्षा, वीजपुरवठा आणि इंटरनेट सुविधांसह अन्य व्यवस्थांची माहिती देण्यात आली.

अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा होत असली तरी सभागृहात घेतलेल्या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याची बाब वारंवार समोर येते. त्यामुळे केवळ चर्चा करून थांबण्याऐवजी संबंधित निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. बेळगावच्या सुवर्ण विधानसौधमध्ये दर महिन्याला किमान एक बैठक घेऊन विविध प्रश्नांचा आढावा घेण्याच्या प्रस्तावावरही विचार सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले.

  • अधिवेशनात नावीन्यपूर्ण उपक्रम :

यंदाच्या अधिवेशनात विधिमंडळाच्या कामकाजाबरोबरच काही विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये पुस्तक प्रदर्शन, योगाभ्यास आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) माध्यमातून संवाद साधण्याच्या कार्यक्रमाचा समावेश आहे. याशिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जाणार आहेत.

आंदोलनांच्या माध्यमातून उपस्थित होणाऱ्या स्थानिक प्रश्नांबाबतही प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा आणि तालुका स्तरावरच चर्चेद्वारे सोडवता येणाऱ्या समस्या अधिवेशनापर्यंत येऊ नयेत, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आधीच उपाययोजना कराव्यात, असे सांगण्यात आले आहे. सभागृहात विकासाशी निगडित विषयांना प्राधान्य देऊन कामकाज अधिक परिणामकारक करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.

बेळगावमध्ये अधिवेशनासाठी येणाऱ्या आमदारांच्या निवासाची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याच्या दृष्टीने आमदार भवनाच्या धर्तीवर स्वतंत्र इमारत उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही विधानसभा अध्यक्षांनी नमूद केले.

विधान परिषद सभापती सलीम अहमद यांनीही अधिवेशनात संपूर्ण कर्नाटकाच्या विकासाच्या प्रश्नांसोबत उत्तर कर्नाटकातील समस्यांवर विशेष चर्चा घडवून आणली जाईल, असे सांगितले. प्रलंबित प्रश्नांवर आंदोलन करण्यापूर्वीच चर्चा करून त्यांचे निराकरण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

लोकशाही व्यवस्थेत आंदोलनांना महत्त्वाचे स्थान असले तरी त्याचा परिणाम विधिमंडळाच्या कामकाजावर होऊ नये, अशी अपेक्षा अहमद यांनी व्यक्त केली. सभागृहात कोणत्या विषयांवर चर्चा घ्यायची, याबाबत सरकार आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. तसेच आमदारांची सभागृहातील उपस्थिती वाढवण्यासाठीही आवश्यक पावले उचलण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार भवन उभारण्याच्या प्रस्तावावर सविस्तर विचारविनिमय करून योग्य निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला सभागृह सचिव विशालाक्षी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन, पोलीस आयुक्त प्रकाश निकम, जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.