• सुवर्ण विधानसौध परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण सुरू

बेळगाव : आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण विधानसौध परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती आणि डांबरीकरणाची कामे युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहेत. अधिवेशनासाठी येणाऱ्या मंत्री, आमदार तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रवासात अडचणी येऊ नयेत, यासाठी महामार्गावरील खराब झालेल्या रस्त्यांचे नूतनीकरण वेगाने केले जात आहे.

दरम्यान, या कामांसाठी वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आल्याने हलगा सर्व्हिस रोडवर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बेळगावच्या दिशेने येणारी वाहने हलगा गावातील सर्व्हिस रोडवरून बागेवाडीकडे वळविण्यात येत असल्याने या मार्गावर वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

रस्त्यांची कामे सुरू असतानाच पर्यायी मार्गावरील वाहतुकीचे योग्य व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. वाढती वाहनांची गर्दी लक्षात घेऊन महामार्ग वाहतूक पोलिसांनी विशेष नियोजन करावे आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांतून होत आहे.