- टेंडर प्रक्रिया तात्काळ रद्द करण्याची मागणी
बेळगाव : केंद्र आणि राज्य सरकारच्या वीज क्षेत्रातील खाजगीकरणाच्या धोरणाविरोधात कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठे आंदोलन करण्यात आले. या वेळी शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त केला आणि आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले.
आंदोलनादरम्यान शेतकरी नेते चुनप्पा पुजारी यांनी सरकारच्या धोरणांवर टीका करत वीज क्षेत्रात खाजगीकरणाच्या माध्यमातून सर्वसामान्यांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकला जाण्याची शक्यता व्यक्त केली. सुरुवातीला कमी दर किंवा सवलतीच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करून नंतर दरवाढ करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.
तसेच वीज वापरासाठी स्मार्ट कार्ड आणि जीपीएस आधारित यंत्रणा लागू केल्यास ग्राहकांच्या खात्यातील रक्कम संपल्यानंतर वीजपुरवठा तात्काळ खंडित होऊ शकतो. याचा सर्वाधिक फटका शेतकरी आणि सामान्य नागरिकांना बसण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
सरकारने वीज खाजगीकरणासंदर्भातील निविदा प्रक्रिया तातडीने रद्द करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. तसे न झाल्यास राज्यभरातील शेतकरी एकत्र येऊन राष्ट्रीय महामार्ग रोखण्यासह तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला.
या आंदोलनात शेतकरी नेते प्रकाश नाईक यांच्यासह विविध भागांतील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.








