- जुलै अखेरीसाठी पाणीपुरवठ्याचे नियोजन तयार
- जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची माहिती
बेळगाव : यंदा मान्सूनच्या आगमनाला काहीसा उशीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पुरेल, अशा पद्धतीने पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
पाण्याच्या प्रश्नावर कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची लवकरच बैठक होण्याची शक्यता असून, त्यामध्ये महाराष्ट्राकडून मिळणाऱ्या दोन टीएमसी पाण्याबाबत चर्चा होणार आहे. कृष्णा नदीवरील हिप्परगी बॅरेजमध्ये तांत्रिक अडचणींमुळे यापूर्वी काही प्रमाणात पाणी वाया गेले होते. तसेच महाराष्ट्राकडून मिळणारा दोन टीएमसी पाण्याचा पुरवठा सध्या बंद असल्याने हा मुद्दा राज्य सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होऊन महाराष्ट्राकडून दोन टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील हिडकल्ल आणि मलप्रभा जलाशयांमध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध असून, त्याचा वापर प्राधान्याने पिण्याच्या पाण्यासाठी केला जात आहे. बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयातील पाण्याची पातळी कमी झाली असली, तरी नियोजनबद्ध वापरामुळे जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पाणीपुरवठा सुरळीत ठेवता येणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
परिस्थिती लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका आयुक्तांना खाजगी विहिरी आणि पाण्याचे टँकर उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, हवामानातील बदलांमुळे यंदा पावसाचे आगमन काहीसे उशिराने होत असले, तरी जिल्ह्यात सुमारे ३५ ते ४० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तसेच पशुधनासाठी आवश्यक असलेला चारा पुढील काही आठवड्यांसाठी पुरेसा उपलब्ध आहे. पिण्याच्या पाण्याची गरज प्रथम पूर्ण केल्यानंतरच शेतीसाठी पाणीपुरवठ्याचा विचार केला जाईल, असेही मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले.








